शाळेची भूमिका, शिक्षणाबद्दलचे विचार आणि त्यानुसार शाळेने स्वीकारलेली अध्यापन पद्धती आणि त्यास पूरक असे विविध उपक्रम याविषयी माहिती देण्यासाठी दर दोन महिन्यातून एकदा पालकसभा घेतली जाते. मुलांचा आहार, आरोग्य आणि स्वच्छता अशा विषयांचाही यात समावेश असतो
मुलांच्या वाढण्याच्या, शिकण्याच्या प्रक्रियेत पालक म्हणून आपली भूमिका कशी असावी. मुलांच्या शंकांना, प्रश्नांना कसा प्रतिसाद द्यावा अशा गोष्टी समजून घेण्यासाठी कार्यशाळांचे प्रयोजन केले जाते. मुलांचा हट्ट, सवयी, स्वयंशिस्त अशा विषयांवरही मोकळेपणाने चर्चा केल्या जातात. तज्ज्ञांचे विचार समजून घेतले जातात.
सहा महिन्यातून एकदा मूल्यमापनाच्या निमित्ताने प्रत्येक पालकासोबत व्यक्तिश: संवाद साधला जातो. शाळेत घेतल्या जाणाऱ्या सर्व कृती, दिले जाणारे अनुभव यात आपल्या पाल्याचा सहभाग कसा व किती आहे. आपल्या पाल्याच्या विशेष तसेच लक्षपूर्वक करून घ्याव्या लागणाऱ्या काही बाबी यांविषयीही बोलणे होते.
शिक्षक आपल्या घरी आल्याचा आनंद बालकासाठी अवर्णनीय असतो. शिक्षक, बालक आणि पालक यांच्यात आपलेपणाचे नाते निर्माण होण्यासाठी या गृहभेटी महत्त्वाच्या ठरतात. या निमित्ताने बालकाच्या घरातील वातावरणाचा शिक्षकांना अंदाज येतो.