दि शिक्षण मंडळ, गोरेगाव ही संस्था आणि संस्थेने सुरू केलेली अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा 1940 मधे सुरू झाली. 1942 मधे संस्थेची रीतसर नोंदणी झाली, तिला स्वत:चा भूखंड आणि इमारत मिळाली, शाळेचे नामकरण झाले तसेच शासनाकडून शाळेला मान्यता मिळाली आणि 18 ऑक्टोबर 1942 रोजी दसऱ्याला नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. त्यामुळे 1940 मधे शाळा सुरू झाली असली तरी 1942 हे पहिले वर्ष म्हणून समजले गेले.संस्थेने आता पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शाळा, संगणक केंद्र, क्रीडा अकादमी तसेच शैक्षणिक गुणवत्तेला वाहून घेतलेले एक स्वतंत्र केंद्रही सुरू केले आहे.
संस्थेच्या मोठ्या परिवारातील अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, ही सर्वात जुनी शाळा. शाळेचे 14,000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आहेत. ते सर्व या परिवाराचे सदस्य आहेत. नव्याने सुरू झालेल्या या वेबसाईटच्या माध्यमातून त्या सर्वांपर्यंत पोहोचता येणार आहे. 1960 पासून 1990 पर्यंतच्या काळात शालांत परीक्षेला बसलेल्या माजी विद्यार्थ्यांचे अनेक स्नेहमेळावे गेल्या काही वर्षांत झाले. आपली जुनी शाळा आणि तिचे बदललेले स्वरूप पाहायला, आपल्या शिक्षकांना भेटायला माजी विद्यार्थ्यांची पावले पुन्हा शाळेकडे वळू लागली आहेत. माजी विद्यार्थ्यांशी पुन्हा एकदा नाते जोडण्यासाठी संस्थेने त्यांची माहिती संकलित करायचे ठरवले आहे. या सोबत एक फॉर्म जोडला आहे. तो ऑनलाईन भरून द्यावा, असे सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करित आहोत.
2017-18 हे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.