मुंबईजवळील गोरेगाव या खेड्यातील मुलांना शिक्षणाची सोय गावातच उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने 1940 साली ‘दि शिक्षण मंडळ, गोरेगाव’ या संस्थेची स्थापना झाली.
केवळ चार मुले व तीन मुलींना बरोबर घेऊन अंबाबाई देवस्थानच्या आवारात इयत्ता पाचवी, म्हणजे तेव्हाच्या इंग्लिश पहिलीपासून शाळा सुरू झाली.
1940 साली आद्यगुरुजी गोविंद पातकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विस्तार आज एका मोठ्या वटवृक्षात झाला आहे.
संस्थेच्या डोसीबाई जीजीभॉय बालविहार (बालवाडी), डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा (1ली ते 4थी) आणि अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल (5वी ते 10वी), या तीन शाळांमधे मध्यम व निम्न आर्थिक स्तरातील 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 'कमला मफतलाल मेहता संगणक केंद्र', 'अ. भि. गोरेगावकर क्रीडा अकादमी' आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करणारे 'प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास' (प्रयास), अशी तीन केंद्रे सुरू झाली आहेत. मुलांना शिकवताना त्यांच्या शिक्षणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडलेल्या सर्वांनी एकमेकांच्या सहाय्याने समृध्द होण्यासाठी प्रयत्न करणे व विद्यार्थ्यांना समृध्द होण्यासाठी मदत करणे या उद्देशाने ‘प्रयास’ काम करत आहे.
मंडळ पुढील उद्दिष्ठांसाठी ‘प्रयास’ मार्फत सतत प्रयत्न करत असते.