शाळेत मूल एका विशिष्ट वातावरणात नवीन गोष्टी पाहते, अनुभवते, अनुकरण करते. शिकण्याच्या या सर्व टप्प्यांमधून ते जात असते, म्हणूनच दैनंदिन वर्गकृती मुलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. ओवणे, शिवणे, फाडणे, चिकटवणे, घडी करणे
हस्त-नेत्र समन्वयाच्या कृती, तार्कीक विचाराला वाव देणाऱ्या चित्रकोड्यांसारखे खेळ, लहान स्नायूंच्या विकासासाठी रंगोळी, खळ, मातीकाम, चेंडूंचे खेळ घेतले जातात. भातुकली, मुक्तखेळ, जोडणीचे खेळ खेळायला दिले जातात. साभिनय गाणी म्हणणे, नाच करणे यांचाही दैनंदिन कृतींमध्ये आवर्जून समावेश केला जातो.
बालवाडीत दैनंदिन कृतींवर आधारित खेळ तयार केले जातात. सर्व मुलांचा त्यात सहभाग असतो. कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या अभिनय गीताने होते. यासाठी लागणाऱे साहित्य पालकांच्या मदतीने तयार केले जाते. सर्वच मुलांचे पालकांच्या हस्ते पदके घालून कौतुक केले जाते.
बालविहारात दोन वर्ष झाल्यानंतर पहिलीत जाण्यापूर्वी बालगटाच्या मुलांना निरोप देण्यासाठी रात्रशिबिराचे आयोजन केले जाते. आई - बाबांशिवाय ही मुले शिक्षक आणि आपल्या वर्गमित्रांसोबत शाळेत संध्याकाळपासून एक रात्र राहतात. या वेळी विविध मनोरंजनाचे खेळ, आकाशदर्शन व सहभोजन असा कार्यक्रम असतो. मुलांना शाळेकडून भेट म्हणून त्यांचा वर्गफोटो आणि गोष्टीचे पुस्तक दिले जाते. रात्रशिबिराच्या आठवणी त्यांच्यासाठी अविस्मरणीय असतात.
या वयाच्या बालकांना आपल्या सवंगड्यांसोबत एकत्र खेळायला आवडते. असे मोकळे बागडण्यासाठी शिक्षक बालकांना जवळच्या अशा बागेत सहलीसाठी घेऊन जातात, जिथे त्यांच्या आवडीचे खेळ उपलब्ध असतील.
या वयातील मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडते. त्यांची भाषा, कल्पनाविश्व, तर्क या गोष्टी समृद्ध होण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या, भरपूर गोष्टी वाचून दाखवणे गरजेचे असते. शाळेत दररोज गोष्टी वाचून दाखवल्या जातातच पण मुलांना घरी देखील गोष्टी वाचून दाखवल्या जाव्यात म्हणून दर आठवड्याला पालकांना घरी नेण्यासाठी पुस्तके दिली जातात. त्याचप्रमाणे मुलांची वाढ, त्यांचा आहार आणि मुलांकडून येणारे प्रश्न कसे हाताळावेत, यासाठी मार्गदर्शक ठरणारी पुस्तकेही पालकांना दिली जातात.
१५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण तसेच गणेशोत्सव, नाताळ, रंगपंचमी, रक्षाबंधन, ईद, दिवाळी, वृक्षदिंडी असे सर्व सण विशिष्ट पद्धतीने साजरे केले जातात. हे सण साजरे करताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही, उलट त्याचे संवर्धन कसे होईल, याचाच विचार केला जातो.
मुलांनी टाकाऊ सामानातून आपल्या कलाकुसरीने तयार केलेल्या वस्तूंचा सजावटीसाठी वापर, स्वत: बनवलेल्या राख्या मुलामुलींनी एकमेकांना बांधणे, आपणच पिकवलेल्या भाजीचा खाऊ सर्वांनी मिळून तयार करून खाणे, भाज्या व फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून रंगपंचमी खेळणे अशा पद्धतीने सण व उत्सव साजरे केले जातात.