प्राथमिक शाळेत येणाऱ्या मुलांचा वयोगट सहा ते दहा वर्ष असतो. त्यांच्यासोबत काही उद्दिष्ट ठरवून योग्य दिशेने काम केल्यास एक सुजाण व्यक्तिमत्त्वाची जडण घडण होऊ शकते. शाळेत त्यादृष्टीने विषय शिक्षणाबरोबरच सहशिक्षण आणि सहजशिक्षणाचा जाणीवपूर्वक अंतर्भाव केलेला आहे. शाळेतल्या लहानशा नियमापासून ते विशेष उपक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीचा मुलावर संस्कार होत असतो. हे साध्य करण्यासाठी शिक्षकांचे विषयज्ञान, अध्यापन पद्धती, बालमानसशास्त्र, त्यांची मानसिकता आणि दृष्टीकोन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. यासाठी शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींकडून शिक्षकांना नियमित प्रशिक्षण देण्याची व्यवस्था संस्था करते. शाळेच्या उभारणीपासूनच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. लीलाताई पाटील, शिक्षणतज्ज्ञ श्रीमती वर्षा सहस्रबुद्धे यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले.
पुढील काही मूल्ये रुजवण्याचा विशेष प्रयत्न शाळेत केला जातो. त्यामुळे मुलांना आत्मविश्वास मिळतो व ती स्वावलंबी होतात.
अध्यापनाची प्रक्रिया एकतर्फी न ठेवता शिक्षकाने मुलांनाही त्यात सहभागी करून घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलांना स्वतंत्र विचार करण्याची संधी मिळते. त्यांची समज तयार होत जाते. शिकवताना केवळ परीक्षेसाठी पाठ्यक्रम पूर्ण करण्याऐवजी अभ्यासक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न शाळेत केला जातो. विषय कोणताही असो त्यातील संकल्पना स्पष्ट झाल्या तर विषयाचे आकलन होते. या दृष्टीने वर्गातील कामाची आखणी केली जाते. त्यासाठी वर्गातील शिकवण्यात पुढील बाबींचा आवर्जून विचार केला जातो.
शाळेत मुले प्रत्यक्ष बियाणे पेरतात, मशागत करतात, कीड लागल्यास किटकनाशकांची फवारणी करतात या सर्व कृती ते स्वत: करतात. पिकाच्या वाढीचे निरीक्षण करतात, तयार झालेल्या पिकापासून एखादा पदार्थ तयार करून मिळून त्याचा आस्वाद घेतात. हा एक अनुभव त्यांना अनेकविध गोष्टी शिकवून जातो आणि तो कायम लक्षात राहणारा असतो. असे अनुभव मुलांना दिले जातात.पावसात भिजणे, भाज्या स्वच्छ करणे, चिरणे, शिजवणे असे काही अनुभव मुलांनी घेतले असल्यामुळे त्यांच्या अनुभव लेखनात जिवंतपणा येतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असल्यामुळे त्यांच्या लिखाणातही विविधता येते.
गणित हा विषय मुलांना समजण्यास कठीण वाटतो. गणितातील क्रिया प्रत्यक्ष वस्तू हाताळून समजण्यास सोप्या जातात. मुलांना ते जमत असल्याचा आत्मविश्वास मिळतो. संख्या, बेरीज, वजाबाकी या गणितातील संकल्पनांचे मुलांना आकलन व्हावे, ते सोपे वाटावे, विषयाबद्दलची भीती नाहिशी व्हावी या हेतूने शाळेत गणिती संकल्पना मूर्त, अर्धमूर्त, अर्धअमूर्त आणि अमूर्त अशा चार टप्प्यांमधून शिकवल्या जातात. जसे, काड्यांचे गठ्ठे व सुट्या काड्या वापरून (मूर्त टप्पा), 10 गोळ्यांचे चित्र असलेला दशकाचा पत्ता (दशकाची पेटी) आणि गोळ्याचे चित्र असलेले सुटे पत्ते वापरून (अर्धमूर्त टप्पा), वहीत पेटी व गोळ्यांचे चित्र काढून (अर्धअमूर्त टप्पा) आणि वहीत संख्या वापरून (अमूर्त टप्पा) बेरजेची संकल्पना शिकवली जाते.
गणितातील मापन हा घटक शिकताना मुले आपल्या घरातील सर्व व्यक्तींना दिवसभरात किती पाणी लागते याची नोंद करतात. या एकूण पाण्याचे लीटरमध्ये रुपांतर करतात. यावरून एका कुटुंबाला एका दिवसाला सरासरी किती लीटर पाणी लागते याचा अंदाज करतात. अशा छोट्या कृतींच्या माध्यमातून अभ्यासविषयांची दैनंदिन जीवनव्यवहारांशी सांगड घातल्यामुळे मुलांची त्या विषयातली रुची वाढते. शिक्षण वेगळे न राहाता ते मुलाच्या जगण्याशी जोडले जाते.
परिसर अभ्यास या विषयतील सजीव - निर्जीव या घटकाविषयी बोलताना प्रथमत: या दोन्ही शब्दांचा भाषिक अंगाने विचार केला जातो. त्या शब्दाची फोड कशी आहे? त्यातून काय अर्थबोध होतो? यावर मुलांसोबत चर्चा होते त्यातून मुलांना ही संकल्पना समजणे सोपे जाते आणि मग ते त्यांची लक्षणे स्वत: विचार करून सांगतात. याचवेळी प्राण्यांच्या अवयवांविषयी लिहिताना मुले भाषेत शिकलेली विशेषणे वापरतात. जसे, खारीची शेपूट झुपकेदार तर हत्तीची बारीक व लहान. इथे शिक्षकाची भूमिका माहिती पुरविणाऱ्याची न राहता मुलाला विचार करण्यास उद्युक्त करणाऱ्याची होते.सर्वच विषय परस्परांशी जोडलेले आहेत. वर्गात एक विषय शिकवताना दुसऱ्या विषयाचा संदर्भ आवश्यक तेथे आवर्जून घेतला जातो.
वर्गात शैक्षणिक साधनांचा भरपूर वापर केला जातो. बाजारात मिळणाऱ्या तयार साधनांबरोबर शिक्षक गरजेनुसार साधने तयार करतात. मराठी व इंग्रजीसाठी शब्दकोडी, दिलेल्या निकषावरून शब्द ओळखणे, अर्धे वाक्य पूर्ण करणे यासारखे भाषिक खेळ तयार करतात. मुलांचा शब्दसंग्रह वाढावा, शब्दांच्या विविध छटा त्यांना कळाव्यात आणि त्यांचा वापर त्यांनी दैनंदिन व्यवहारात बोलताना, लिहिताना करावा, एकूणच त्यांची भाषा समृद्ध व्हावी या हेतूने हे शैक्षणिक साहित्य तयार केले जाते. असे साहित्य इतर विषयांसाठीही तयार केले जाते.
अनुभवातून शिकणे गरजेचे असले तरीही सर्वच अनुभव मुलांना प्रत्यक्षात देता येणे शक्य नसते. असे काही अनुभव video, ppt, photos या तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांद्वारा दिले जातात. उदा. ग्रहमाला, आपल्या आंतरेंद्रियांचे कार्य यासारख्या विषयांचे व्हीडीओ इंटरनेटवरून मुलांना दाखवले जातात.
इंग्रजी भाषा बोलण्याची संधी मिळावी, संभाषणाची भीती कमी व्हावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. जसे, प्रत्येक मुलाला आळीपाळीने ध्वनीक्षेपकावर सर्वांसमोर बोलण्यची संधी. तंत्रज्ञान हे शिक्षणाचे अद्ययावत साधन आहे. त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग केल्यास आपणास खूप फायदा होतो याची अनुभूती मुलांना येते.
दैनंदिन अध्यापन करत असताना त्याचवेळी प्रत्येक मुलाचे काम पाहणे, मदत लागणाऱ्या मुलांना आवश्यक ते मार्गदर्शन देणे, वैयक्तीक मूल्यमापन घेणे व त्याच्या नोंदी करणे गरजेचे असते. मुलाला त्याचे काम तपासून त्याबद्दल वेळीच फिडबॅक मिळणेही खूप महत्त्वाचे असते. अशावेळी स्वतंत्रपणे काम करू शकणाऱ्या मुलांच्या गटाला स्वयंअध्ययनाच्या कृती देऊन शिक्षक वरील कामे समांतररीत्या करतात.
एखादी गोष्ट शिकताना मूल अनुभव घेतघेत शिकते. यामध्ये शिकण्याचे अनेक टप्पे असतात. ते सर्वजण एकत्रच पार पाडतात असे नाही. या प्रक्रियेत काहींना मदत लागते, काही न अडखळता पुढे जातात तर काहींना ते पार करणे जमू शकत नाही. आपण यापैकी कोणत्या टप्प्यावर आहोत, ते शोधण्यास शिक्षक मुलाला मदत करतात. तो टप्पा नेमकेपणाने कळल्यामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे हे त्याला कळू लागते. प्रत्येकाच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे हे वेगळेपण नोंदवले गेले आणि त्यानुसार मार्गदर्शन मिळाले तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाचे ‘शिक्षण’ घडेल. शिकण्याच्या या प्रक्रियेची वेगवेगळ्या टप्प्यावर नोंद घेणे म्हणजेच ‘मूल्यमापन’ होय.