आमची ओळख

‘अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल’ ही शाळा 1940 मधे सुरू झाली. मुंबईच्या उपनगरातील एक उपक्रमशील आणि प्रयोगशील शाळा म्हणून ती सुरुवातीपासूनच ओळखली जाते. विद्यार्थ्यांना अनुभवसंपन्न करण्यासाठी, ‘कला-क्रीडा-ज्ञान’ हे बोधचिन्ह स्वीकारलेल्या या शाळेने आणि संस्थेने नेहमीच प्रयत्न केले. बदलत्या काळातील शैक्षणिक आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि नवनवीन शैक्षणिक विचारांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना अनेकविध संधी मिळवून देण्यासाठी दि शिक्षण मंडळ, गोरेगाव नेहमीच अग्रेसर राहिले आहे. विशेषत: गेल्या पंधरा वर्षांत गुणवत्ताविकासासाठी आणि शिक्षकांच्या सबलिकरणासाठी संस्थेने आपल्या शाळांमधीलच नाही, तर इतर शाळांमधील शिक्षकांसाठीही अनेक उपक्रम आयोजित केले. अशा प्रयत्नांना निश्चित अशी दिशा मिळावी, त्यांत सुसूत्रता यावी, या हेतूने या केंद्राची स्थापना करण्यात आली.


स्थापना

केंद्राचे नामकरण आणि औपचारिक स्थापना 2 ऑक्टोबर 2010 रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी झाली. गेली काही वर्षे सातत्याने सुरु असलेले काम लक्षात घेऊन बृहन्मुंबई निवारा अभियान या संस्थेने मंडळाला 60 लाख रुपयांची देणगी दिली.
मंडळाच्या स्थापनेपासून घनिष्ट संबंध असलेले, शिक्षणाविषयी विशेष आस्था बाळगणारे, बृहन्मुंबई निवारा अभियानचे संस्थापक आणि विश्वस्त, प. बा. सामंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्राचे नामकरण ‘प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास’ असे करण्यात आले.
त्याच दिवशी शिक्षण मंडळ, गोरेगावचे कार्यवाह श्री. गिरीश सामंत यांनी लिहिलेल्या शिक्षणहक्क कायद्यावरील ‘वेध शिक्षणाच्या हक्काचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास’ तर्फे प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ‘होमी भाभा विज्ञान केंद्राचे’ संचालक श्री. हेमचंद्र प्रधान आणि ‘जनार्थ’ या संस्थेचे श्री. प्रवीण महाजन यांच्या हस्ते झाले.


भूमिका

गुणवत्तापूर्ण शिक्षण, हे संस्थेचे एक ध्येय आहे. त्यासाठी नवीन वाटांचा नेहमीच शोध घेतला जातो. प्रयोग करून पाहिले जातात. शिक्षकांना तशा संधी मिळण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात, प्रोत्साहन दिले जाते. हे संस्थेच्या कामाचे महत्त्वाचे अंग आहे. त्याचबरोबर शाळा आणि मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक अशी जी एक शिक्षणव्यवस्था असते, तिच्याशी निगडित असणाऱ्या विषयांचा अभ्यास करून त्यासंदर्भातही संस्था काम करते.


अध्ययन-अध्यापनाच्या नवीन वाटांचा शोध

विद्यार्थ्यांनी पाठांतर करून केवळ परीक्षेसाठी न शिकता विचार करायला शिकावे, त्यांची समज वाढावी, तसेच केवळ पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता त्यांनी स्वयंप्रेरणेने इतर मार्गांनी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा, अशी संस्थेची भूमिका आहे. सोयीसाठी भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा अनेक विषयांमधे शालेय शिक्षणाची विभागणी झाली असली तरी त्या विषयांचा परस्पर संबंध असतो, आणि शिकण्याचा रोजच्या जगण्याशी संबंध असतो, हे विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक असते.
हे घडण्यासाठी विषयज्ञानाबरोबर शिक्षकांचा दृष्टिकोन आणि मानसिकता महत्त्वाची असते, अशी संस्थेची धारणा आहे. त्यासाठी संस्था सतत प्रयत्न करते. त्या दृष्टिने उपयुक्त अशी प्रशिक्षणे, कार्यशाळा, व्याख्याने, इतर उपक्रमशील संस्थांना भेटी असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. शिक्षक नवनवीन प्रयोग करून पाहतात, वेगवेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष केलेल्या कामातून त्यांना प्रेरणाही मिळते. य़ोग्य अशी मानसिकता आणि दृष्टिकोन तयार झाला, तर शैक्षणिक प्रयोग हे प्रयोग न राहता ती एक वृत्ती आणि अव्याहत सुरू राहणारी प्रक्रिया बनेल. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू लागेल. असे शिक्षक नव्या युगातील मुलांच्या शिक्षणाची आव्हाने पेलू शकतील, असा विश्वास आहे.
ज्ञानार्जन करतानाच विद्यार्थ्याने एक विवेकी, संवेदनशील, जबाबदार नागरिक बनावे, अशी जी अपेक्षा शिक्षणाकडून केली जाते, ती पूर्ण करण्याची ताकद आणि ऊर्जा या प्रक्रियेतून मिळू शकेल, असा विश्वास वाटतो. या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे शिक्षक. त्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे, काळासोबत घडणाऱ्या बदलांचा योग्य पद्धतीने स्वीकार करणे, वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांची मते समजून घेणे अपरिहार्य आहे. हे सगळे करणे शिक्षकांना सुकर व्हावे म्हणून संस्था प्रोत्साहन देत असते. त्यातील एक उल्लेखनीय भाग म्हणजे मागील 5-6 दशकांपासून विशिष्ट पद्धतीने साजरा केला जाणारा शिक्षकदिन.


शिक्षकदिन

शिक्षकदिनाच्या निमित्ताने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ग्रंथभेटकार्ड दिली जातात. या रकमेतून शिक्षक स्वत:च्या आवडीची पुस्तके विकत घेतात. यामुळे त्यांचे स्वत:चे असे एक छोटेखानी ग्रंथालय तयार झाले आहे. शिक्षकदिनाच्या निमित्ताने सर्व सेवकांना दर वर्षी त्यांच्या सार्वजनिक भविष्य निधी योजनेत भरण्यासाठी ठराविक रक्कम दिली जाते. याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक भेटी, कार्यशाळा, व्याख्याने अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आतापर्यंत शिक्षकांनी कोसबाड येथील अनुताई वाघ यांची शाळा, जलशुद्धीकरण प्रकल्प, सगुणा बाग, वांद्रे - वरळी सी लिंक, सेंट झेवियर्स महाविद्यालय अशा सारख्या अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत.


शिक्षणसमृद्धी

चांगले शिक्षण मिळणे म्हणजे, सर्व अंगांनी समृद्ध होत जाणे. अशा रीतीने मुलांचे शिक्षण होत असताना त्यांच्या शिक्षणाशी जोडलेली मोठी माणसेही स्वत: शिकत जातात, अनुभवसंपन्न होतात, समृद्ध होतात, त्यांचा योग्य असा दृष्टिकोन आणि मानसिकता तयार होत जाते, असा अनुभव आहे. ते शिकवता येत नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न करत राहणे, हा या केंद्राचा एक हेतू आहे. म्हणून केंद्राचे नामकरण ‘प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास’ असे केले आहे.


शिक्षणव्यवस्थापन

सर्वसाधारणपणे मुलांच्या शिक्षणाचा विचार केला तर मुले, शिक्षक, शाळा अशा गोष्टीच नजरेसमोर येतात. परंतु हे तीन घटक एका मोठ्या शिक्षणव्यवस्थेचा एक लहान भाग आहेत. मुले शिकती होण्यासाठी आणि शाळा सुरळीत चालण्यासाठी ही महाकाय शिक्षणव्यवस्था सतत कार्यरत असते. केंद्रशासन आणि राज्यशासन, स्थानिक स्वराज्यसंस्था व खाजगी संस्था तसेच शिक्षक, पालक आणि एकूणच समाज या सर्वांना ती परस्परांशी जोडते. मुलांच्या शिक्षणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करणारी ही व्यवस्था शैक्षणिक उद्दिष्ट्ये व धोरणे; कायदे व नियम; शिक्षकप्रशिक्षण, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, परीक्षा, साधनसामग्री; योजना, उपक्रम, अंमलबजावणी; अर्थव्यवस्था, अशा अनेक अंगांनी काम करत असते.
मुलांच्या शिक्षणाशी जोडलेल्या व्यक्ती आणि संस्था या बाबी समजून घेऊन आपापल्या परीने या कामात योगदान देत असतात. या केंद्राच्या माध्यमातून दि शिक्षण मंडळ, गोरेगाव आपला खारीचा वाटा उचलण्याचे काम करते. शिक्षण व्यवस्थापनाविषयीच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून हे काम तीन स्तरांवर केले जाते. (१) आपलीच संस्था व शाळा, (२) इतर संस्था व शाळा, (३) केंद्र व राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि (४) जनजागृती.
शैक्षणिक व्यवस्थापनाच्या आणि अंमलबजावणीच्या संदर्भात शिक्षक, शाळा आणि संस्थांना अनेक अडचणी जाणवत असतात. शिक्षकसंख्या, संचमान्यता, नवीन नेमणुका, प्रवेश, शिक्षण हक्क कायद्यातील विविध बाबी, अनुदान, इत्यादी बाबतीत अडचणी येत असतात. त्या संदर्भात या केंद्रातर्फे काही प्रयत्न केले जातात.
शिक्षणाशी संबंधित कायदे, नियम, विधीमंडळापुढे असलेली विधेयके तसेच शासननिर्णय आणि परिपत्रकांचा अभ्यास करून त्यावर शासनाला सूचना केल्या जातात. बदल सुचविले जातात. महत्त्वाच्या विषयांवर इतर संस्थाचालकांसह प्रश्नांची हाताळणी केली जाते आणि विविध विषयांवर लेख प्रसिद्ध करून तसेच चर्चासत्रांत भाग घेऊन जनजागृतीसाठी प्रयत्न केले जातात.


कार्यकारी समिती


गिरीश सामंत
केंद्राध्यक्ष

शलाका देशमुख
केंद्रप्रमुख


क्षमा प्रभू
सदस्य



प्रकाश सामंत
सदस्य



विजया आसबे
सदस्य



नीलम गिरप-पाटील
समुपदेशिका


शालिनी येलोंडे
कनिष्ठ लिपिक
child porno child porno astropay astropay