प्रकल्प

शालेय शिक्षणात महत्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे ‘शिक्षक’ होय. त्यांना आपल्या विषयज्ञानाबरोबरच पुढे येणारे नवनवीन शैक्षणिक विचार, अध्यापनपद्धती समजून घ्याव्या लागतात आणि त्या वापरून पाहाव्या लागतात. आपली कौशल्ये आणि क्षमता जोपासण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी शिक्षकांना तज्ज्ञांकडून नियमितपणे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणे गरजेचे असते. शासनाने वेळोवेळी आयोजित केलेल्या प्रशिक्षणांशिवाय संस्था स्वत: अशी प्रशिक्षणे आपल्या तिनही शाळांमधील शिक्षकांसाठी आयोजित करते. त्यांत विषयज्ञानाबरोबर बालमानसशास्त्र, वेगवेगळ्या वयातील मुलांचे प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि शैक्षणिक साधनांचा अध्यापनात वापर, अध्यापनातील विविध प्रयोग इ. विषयांचा समावेश असतो. संस्था नेहमीच शिक्षकांना त्यांच्या कामाबद्दल, ते करू पाहत असलेल्या प्रयोगांबद्दल प्रोत्साहनही देत असते.

शाळेच्या सुरुवातीच्या काळात शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीला पाटील आणि वर्षा सहस्रबुद्धे या शिक्षणतज्ज्ञांकडून मंडळाच्या शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे बालशिक्षणाबाबतचे आमचे सर्वांचे विचार स्पष्ट होत गेले, निश्चित अशी दिशा मिळत गेली. शाळेच्या उभारणीत या दोन व्यक्तींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

शिक्षणक्षेत्रात विशेष काम करणाऱ्या इतर जाणकार आणि अनुभवी व्यक्ती, तसेच संस्थांकडूनही गेल्या पंधरा वर्षांत शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण मिळत आले आहे. अशा प्रकारची प्रशिक्षणे, शिक्षकांच्या चर्चा, आणि प्रत्यक्ष उपयोजनात संस्थाचालक जातीने लक्ष घालतात आणि आवश्यक ती मदत करतात तसेच गरजेनुरुप सुविधा, साधने उपलब्ध करून देतात. संस्थाचालकांकडून मिळणाऱ्या अशा प्रकारच्या मदतीने शिक्षकांना मोठा आधार मिळतो. त्यामुळे शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यात सौहार्दपूर्ण नाते निर्माण झाले आहे.

संस्थेच्या शाळांसाठी ...


प्रशिक्षण



1999-2000 मध्ये संस्थेने डोसीबाई जीजीभॉय बालविहार आणि डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा सुरु केली. सुरुवातीच्या काळात बालविहारच्या शिक्षकांनी एस्. एन्. डी. टी. विद्यापिठाच्या प्रा. भारती गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी सलग पाच-सहा वर्षे पूणे येथील अक्षरनंदंन या प्रायोगिक शाळेच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका वर्षा सहस्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. अजूनही गरजेनुसार मंडळाच्या शिक्षकांना विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत असते.
डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्राचे अरूण मावळंकर यांच्याकडून प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी गणित विषयासाठी प्रशिक्षण घेतले. त्यांत प्रामुख्याने शिक्षकांच्या स्वत:च्या गणिती संकल्पना स्पष्ट व्हायला मदत झाली.
शिक्षणक्षेत्रातील जाणकार व अनुभवी सुबोध केंभावी यांच्याकडून संस्थेच्या अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांनी मराठी, इंग्रजी, गणित या विषयांसाठी मार्गदर्शन घेतले. यातून शिक्षक अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती, संदर्भ साहित्याचा वापर, मूल्यमापनाची विविध तंत्रे, पुन:अध्यापन, विषयांमधील सहसंबंधाचा विचार करून वर्गातील अध्यापन, गटकार्यात मुलांचा सक्रिय सहभाग यासारख्या बऱ्याच गोष्टी शिकले.
इंग्रजी भाषेचे तज्ज्ञ प्रशिक्षक गुरमीतसिंग मेहताब यांनी शिक्षकांना त्यांचे इंग्रजी चांगल्या दर्जाचे होण्यासाठी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही पुढे ऑनलाईन ट्रेनींग सुरु ठेवले. शिक्षकांसाठी कार्यशाळाही घेतल्या. यामुळे शिक्षकांना स्वत:चे इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम संधी व मार्गदर्शन मिळाले.


मनोविकास

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे आणि समुपदेशक प्रतिमा हवालदार यांच्या तीन कार्यशाळा शिक्षकांसाठी आयोजित केल्या. आत्मपरिक्षण, पालक सभा आणि शिस्त हे या कार्यशाळांचे विषय होते. तसेच 2009 मध्ये केशव गोरे स्मारक ट्रस्ट तर्फे डॉ. आशिष देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मौज’ नावाचा एक वर्षाचा प्रकल्प इ. 6 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसोबत घेतला. डॉ. देशपांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाते.


आरोग्यभान

वाढत्या वयातील शारीरिक बदलांबाबत शिक्षकांना विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद करता यायला हवा. या हेतूने डॉ. मोहन देशपांडे यांची ‘आरोग्यभान’ या विषयावर माध्यामिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आपल्या शरीराची संपूर्ण ओळख करून देण्यात आली. स्त्री - पुरुष नाते, एकमेकांच्या आणि स्वत:च्या शरीराचा आदर करायला हवा हा महत्त्वाचा विचार मुलांसमोर खूप सहजपणे आला. तसेच चांगला व वाईट स्पर्श ओळखून त्याबद्दल आपण जागरूक असायला हवे आणि तसे असल्यास त्याविरोधात आवाजही उठवायला हवा याविषयी मुलांना माहिती मिळाली.


प्रोजेक्ट बेसड् लर्निंग

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे शाळांमधील शिक्षकांसाठी ‘प्रोजेक्ट बेसड् लर्निंग’ संबंधी पाच कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. एखादा विषय, घटक, संकल्पना मुलांना स्वत:हून कशाप्रकारे शिकता येतील, तसेच या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका काय असावी आणि ते करताना मुलांना द्याव स्वातंत्र्य या विषयीचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले गेले. माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक या कार्यशाळांमध्ये सहभागी झाले होते.


भारत पेट्रोलियमचा स्टँनफोर्ड युनिव्हर्सिटी प्रकल्प

शैक्षणिक वर्ष 2010-11 च्या अखेरीस भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे मोबाईल लर्निंग या उपक्रमासाठी संस्थेच्या प्राथमिक शाळेची निवड केली होती. स्टँनफोर्ड युनिव्हर्सिटीने तांत्रिक साहाय्य केले होते. तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, त्या अनुषंगाने शिक्षकाची बदललेली भूमिका व अध्ययन पध्दतीतील बदल या गोष्टी शिक्षकांना अनुभवायला मिळाल्या. इ. 3 री व 4 थीच्या मुलांचा यात सहभाग होता. मुलांची तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकण्याची सहजता, इंग्रजीचा अडसर पार करणे, परस्पर सहकार्याने शिक्षण, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य या गोष्टींचा अनुभव शिक्षकांना प्रकल्पादरम्यान आला.


गायनाचे वर्ग


ज्ञान व क्रीडेबरोबरच कलेचा विकास व्हावा व विद्यार्थ्यांची संगीतातील रूची वाढावी म्हणून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत दर आठवड्याला गायनाचे तास होतात. रेखा पटवर्धन हे वर्ग घेतात. याव्यतिरीक्त ज्या मुलांना विशेष आवड आहे त्यांच्यासाठी संध्याकाळी जादा वर्ग घेतले जातात.


संडे सेशन्स



2012 पासून प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत हे ऐच्छिक वर्ग घेतले जात आहेत. या वर्गांमध्ये इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, भूगोल, इतिहास अशा विविध शाखांतील विषयांबद्दलची कुतूहल वाढवणारी माहिती दिली जाते. त्यासाठी संगणक, प्रोजेक्टर अशा साधनांचा वापर केला जातो. अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी या वर्गाची जबाबदारी घेतलेली आहे.


ज्युनिअर सायन्स ऑलिंपिया़डचे वर्ग

इंडीयन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन या संस्थांतर्फे ज्युनिअर सायन्स ऑलिंपिया़ड ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची काठिण्यपातळी जास्त असते. ही परीक्षा इंग्रजीतून द्यायची असते. परीक्षा पाच टप्प्यामध्ये घेतली जाते. यातील पहिला टप्पा म्हणजे नॅशनल सायन्स एक्झाम इन ज्युनिअर सायन्स हा आहे. या परीक्षेला बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी संस्थेच्या माध्यमिक शाळेत 2014 पासून वर्ग घेतले जात आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञ असे शाळेचे माजी विद्यार्थी मुलांना मार्गदर्शन करतात.


सायन्स एनरिचमेंट प्रोग्राम

विज्ञान विषयातील प्रज्ञावान मुलांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन देण्यासाठी मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे सायन्स एनरिचमेंट प्रोग्राम आयोजित केला जातो. 2015-16 पासून विज्ञान अध्यापक मंडळाने शिक्षण मंडळ, गोरेगावच्या सहयोगाने या उपक्रमाचे केंद्र अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल येथे सुरु केले आहे.


प्रोजेक्ट रिइन्वेंटींग स्कूलिंग

मंडळाच्या तीनही शाळांमधील इंग्रजी भाषेचा दर्जा वाढवण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा उत्तम असण्याची गरज लक्षात घेऊन गुरुमीतसिंग मेहताब यांच्यासोबत हा प्रकल्प सुरु केला. इंग्रजी भाषेचे तज्ज्ञ प्रशिक्षक असलेल्या गुरमीत सिंग यांनी या प्रकल्पाअंतर्गत शाळेशी जोडलेल्या संपूर्ण व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्नही केला. माजी विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी अशा शिक्षण प्रक्रियेशी अप्रत्यक्षपणे जोडलेल्या घटकांचे सक्षमीकरण शाळेला समृद्ध करण्यासाठी पूरक ठरते हा विचार या प्रकल्पातून दिसून आला. अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांना प्रभावीपणे करता येण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक खूप सहजतेने तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत.


सुजया फाऊंडेशनचा इंग्रजीसाठी प्रकल्प

मंडळाच्या तीनही शाळांमधील इंग्रजी भाषेचा दर्जा वाढवण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी भाषेवर विशेष काम करणाऱ्या सुजया लर्निंग फाउंडेशनने विकसित केलेला तीन वर्षांचा ‘सुजया इंग्लिश अॅक्टीव्ह लर्निंग प्रोग्राम’(SEAL) हा प्रकल्प 2015-16 पासून सुरू करण्यात आला आहे. शालेय तासिकांमध्येच संगणकाच्या मदतीने अध्ययन - अध्यापन केले जाणारा हा प्रकल्प माध्यमिक शाळेत सुरु केलेला आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले .


इंग्लिश इमर्शन कोर्स



मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना आणि त्यानंतर नोकरीसाठी मुलाखती देताना विशेष उणीव जाणवते ती इंग्रजीतून संभाषण करण्याची, आपली मते - विचार इंग्रजीतून मांडता येण्याची. केवळ इंग्रजीतून संभाषण करता येत नसल्यामुळे आत्मविश्वासही डळमळतो आणि उत्तम क्षमता असणारे विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात मागे पडतात. काळाची ही गरज लक्षात घेऊन गेल्या वर्षापासून शालांत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुजया लर्निंग फाऊंडेशनने तयार केलेला 15 ते 20 दिवसांचा पूर्णवेळ कोर्स सुरू केला आहे. यात इंग्रजी भाषेबरोबरच नोकरीसाठी मुलाखत कशी द्यायची, आपल्या कामाचे सादरीकरण इतरांसमोर करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करायचा अशा महत्त्वाच्या गोष्टींचाही अंतर्भाव होता. हा कोर्स संस्थेच्या शाळांव्यतिरिक्त परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीही खुला असतो.


ब्रीजकोर्स



शालांत परीक्षा दिलेल्या संथेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांनीच घेतलेला 10 ते 15 दिवसांचा हा कोर्स असतो. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील आव्हाने पेलण्याच्या, तिथले वातावरण समजून घेण्याच्या दृष्टीने हा कोर्स घेतला जातो. महाविद्यालयात जाऊ लागलेले शाळेचे माजी विद्यार्थी आणि मदत गटातील जाणकार व्यक्ती मिळून हा कोर्स घेतात. स्वत:चे अनुभव, केलेले प्रयत्न ते या विद्यार्थ्यांपुढे मांडतात. आपण महाविद्यालयातील उपक्रमांत सहभागी होणे, मिळालेल्या संधीचा सदुपयोग करणे, इंग्रजीचा न्यूनगंड न बाळगता मार्ग काढणे अशा मुद्द्यावर इथे चर्चा होतात. या मुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. संवादासाठी आवश्यक इंग्रजीचे प्रशिक्षणही इथे दिले जाते.


शारीरिक शिक्षण प्रशिक्षण

प्राथमिक स्तरावर खेळाची आवड निर्माण झाली, तर पुढे मुले खेळात प्रगती करतात. प्राथमिक शाळेतील मुलांना व्यायाम आणि वयानुरुप खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षकांना क्रीडातज्ज्ञांकडून रीतसर प्रशिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.


परिसरातील शाळा आणि शिक्षणप्रेमींसाठी

प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयासच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांनी एकत्र येऊन काही प्रयोग करावेत, अनुभव व विचारांची देवाणघेवाण करावी. यासाठी परिसरातील काही शाळांसोबत विविध निमित्ताने हे केंद्र जोडलेले आहे. तसेच मंडळाच्या स्वत:च्या शाळांबरोबरच इतर शाळांमधील शिक्षकांसाठीसुद्धा विविध प्रदर्शने, कार्यशाळा, प्रशिक्षणे, व्याख्याने आयोजित केली जातात.


सुवर्णमहोत्सवी वर्षातील शैक्षणिक व्याख्यानमाला

1992 हे संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. या निमित्ताने संस्थेने वर्षभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. यात परिसरातील शाळांच्या शिक्षकांसाठी व्याख्यानमाला आयोजित केली होती . त्यात प्रा. राम जोशी, प्रा. नलिनी पंडीत, डॉ. आनंद नाडकर्णी, रेणू गावस्कर, प्रा. भा. मा. उद्गावकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली.


सी. एल. आर. प्रदर्शन

तीन दशकांपेक्षा जास्त काळ पूर्वप्राथमिक, प्राथमिक व अनौपचारिक शिक्षणप्रकल्पात कार्यरत असणाऱ्या ‘सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस’ या संस्थेतर्फे 2005 मध्ये ‘शिक्षण छोट्यांचे सहभाग मोठ्यांचा’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिक्षकांसाठी प्रशिक्षण, शैक्षणिक साधनांची निर्मिती व दृकश्राव्य साधनांचा वापर हे या प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. छोट्या मुलांची लेखन, वाचन आणि गणिती कौशल्ये आत्मसात करण्याच्या पूर्वतयारीसाठी उपयोगी अशी विविध साधने या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील 5000 पेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.


जे. पी. नाईक जन्मशताब्दी

ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 2007 साली ‘अध्यापन - एक आनंदयात्रा’ हा तीन दिवसांचा कार्यक्रम परिसरातील शाळांमधील शिक्षकांसाठी आयोजित केला होता. जे. पी. नाईक यांचे विचार समजून घेणे, वेगवेगळ्या प्रायोगिक शाळांमधील काम समजून घेणे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपण काय-काय करू शकतो, यासंबंधी शिक्षणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विचार विनिमय करणे असे या कार्यक्रमामागील प्रयोजन होते. या तीन दिवसांत डॉ. सुमन करंदीकरांचे मार्गदर्शनपर भाषण, पुण्यातील ‘अंकुर’ नावाच्या शाळेचे माधुरी देशपांडे यांनी केलेले फोटो स्लाईड्सचे प्रदर्शन, केरळमधील आदिवासी मुलांना शिक्षण देणाऱ्या ‘कणवू’ या शाळेचा माहितीपट, ‘सृजन आनंद’ शाळेच्या संस्थापक व शिक्षक श्रीमती लीला पाटील यांनी घेऊन दाखवलेला 4 थी च्या मुलांचा पाठ आणि शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळेत चालणाऱ्या विविध अध्ययन पूरक उपक्रमांचा, कृतींचा ओझरता आलेख दाखवणारे प्रदर्शन असे विविध कार्यक्रम करण्यात आले.


मराठी शाळांतील इंग्रजी विषयाचे अध्यापन

इंग्रजी विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन मराठी शाळांतील इंग्रजी विषयाचे अध्यापन या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी विषय हाताळताना शिक्षकांना अनेक अडचणी जाणवत असतात. त्या सोडवण्यासाठी शाळा-शाळांमधून विविध पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांची देवाण घेवाण या कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी 19 शाळांमधील इंग्रजी विषयाचे 75 शिक्षक उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक व संस्थाचालकही उपस्थित होते. आपल्या शाळांमधून करत असलेले विविध उपक्रम आणि त्याची मुलांना इंग्रजी अध्ययनात होणारी मदत याबाबत शिक्षकांनी मांडणी केली.


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रदर्शन

2010 मधे शिक्षणहक्क कायदा आल्यानंतर इ. 1 ली ते 8 वी पर्यंत विद्यार्थ्यांना त्याच वर्गात मागे ठेवू नये, तर त्यात्या इयत्तेतच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून त्यांचे शिक्षण पूर्ण होईल असे पाहावे, हा विचार नव्याने पुढे आला. परंतु प्रत्यक्षात काय करायचे, याबाबत शिक्षकांना स्पष्टता येत नव्हती. हा एक चांगला विचार शिक्षकांना व्यवस्थित कळावा, उपयोजनातील त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा, या हेतूने पुण्यातील आपणच या संस्थेने तयार केलेले ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन - आव्हान व दिशा’ हे दोन दिवसांचे प्रदर्शन 2012 मधे भरविण्यात आले. विद्यार्थ्यांचे जे सतत मूल्यमापन करायचे आहे त्याची गरज, उपयोग, हेतू यांची सर्व माहिती शिक्षकांना व्हावी या दृष्टीने प्रदर्शनात माहितीपूर्ण फलक होते. डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा व अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल च्या शिक्षकांनी दररोजच्या अध्यापनातील विषयावरील प्रयोग, उपक्रम, गटकार्य, अनुभव इ. प्रदर्शन स्वरूपात मांडले होते. अनेक मान्यवर, संस्थाचालक, शिक्षणाधिकारी हे प्रदर्शन पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी आले होते. तसेच महाराष्ट्रातील 100 पेक्षाही जास्त शाळांच्या शिक्षकांनी तर एक हजारापेक्षा जास्त लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. ‘आपणच’ च्या अध्यक्ष डॉ. सुमन करंदीकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला आणि शंकांचे निरसन केले.


लिहावे नेटके कार्यशाळा

ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने माधुरी पुरंदरे यांच्या ‘लिहावे नेटके’ या पुस्तकावर आधारित एक कार्यशाळा परिसरातील शिक्षकांसाठी आयोजित केली होती. मराठी भाषेच्या विविध अंगांची ओळख, त्यातली गंमत मुलांना या पुस्तकातील स्वाध्याय सोडवता कशी देता येईल, याचे प्रत्यक्ष वस्तुपाठच स्वतः माधुरी यांनी शिक्षकांना घेऊन दाखवले. परीक्षेच्या पलीकडे जाऊन भाषेतील व्याकरणाकडे बघण्याची गरज आहे असे शिक्षकांच्या लक्षात आले.


विज्ञान शिक्षक गट



स्वत: प्रयोग करून बघत विज्ञान शिकले पाहिजे अणि त्यासाठी दैनंदिन अध्यापनात प्रयोग करून संकल्पना समजून घेण्यावर भर असला पाहिजे, या मुख्य हेतूने सात शाळांमधील विज्ञानशिक्षकांचा गट काम करत आहे. या शाळांच्या विज्ञान व भूगोल विषयांच्या शिक्षक प्रतिनिधींच्या नियमित सभा होतात. तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यांत टेलिस्कोपची माहिती व आकाश निरीक्षण, खगोल जत्रा, सूर्यचित्रिकरण प्रकल्प, पाठ्यपुस्तकातील प्रयोगांचा दैनंदिन अध्यापनात जास्तीत जास्त अंतर्भाव, असे विषय हाताळले जातात. यात होमी भाभा विज्ञान केंद्र, नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन या संस्थांमधील जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन शिक्षक व विद्यार्थ्यांना लाभते. सहभागी झालेले शिक्षक या उपक्रमातून मिळालेल्या विचारांचे आपापल्या शाळांमध्ये उपयोजन करतात.


अभ्यासात मदत लागणाऱ्या मुलांसोबत काम



काही मुलांंच्या लेखन वाचन क्षमतेवर वेगळे काम करण्याची गरज बऱ्याच शाळांमधून असल्याचे लक्षात आले. मागे पडणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत उपचारात्मक शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. परंतु काही मुलांना शाळेच्या पातळीवर मदत दिल्यास ती मुले पुढे जाऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापरून त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत मदत कशी देता येईल याविषयीचे प्रयोग करून पाहत आहोत. अशा प्रयोगांची, त्यातून आलेल्या अनुभवांची देवाणघेवाण या विषयात काम करू इच्छिणाऱ्या शाळांबरोबर केली जाते.


सक्रिय जनगणित प्रकल्प

विद्यार्थ्यांनी गणित समजून आणि केवळ समजूनच शिकावे, ज्यामुळे त्यांना त्या विषयाची गोडी लागेल, या हेतूने मंडळाने नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन या संस्थेने विकसित केलेला तीन वर्षांचा प्रकल्प सुरू केला आहे. सात शाळांमधील 49 शिक्षक या प्रकल्पात सहभागी झाले असून सुमारे 2600 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. 2015-16 ते 2017-18 या तीन वर्षात नवनिर्मितीकडून शिक्षकप्रशिक्षणे आयोजित केली जातील. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून या प्रकल्पाला अर्थसाहाय्य मिळणार आहे.

child porno child porno astropay astropay