वर्ष निवडा

महत्त्वाचे टप्पे

1940


आद्यगुरुजी गोविंद पांडुरंग पातकर

आद्यगुरुजी गोविंद पांडुरंग पातकर यांनी अंबाबाई देवस्थानच्या आवारात एका व्हरांड्यात मोतीराम देसाई टोपीवाले यांच्या परवानगीने इयत्ता 5वी पासून (त्यावेळची ‘इंग्लिश 1ली’) शाळा सुरू केली. त्या काळात शाळेत 5वी पासून इंग्लिश भाषा शिकवायला सुरुवात होत असे. ज्या शाळेत इंग्लिश विषय शिकवला जाई, त्या शाळांना ‘इंग्लिश स्कूल’ असे म्हणायची प्रथा होती. म्हणून शाळेचे नामकरण 'गोरेगाव इंग्लिश स्कूल' असे झाले.

पातकर यांनी गावात घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा केले. सात मुलांना घेऊन त्यांनी सुरू केलेल्या शाळेत तीन मुली होत्या. पातकर गुरुजी पहिले मुख्याध्यापक झाले. देशाची स्वातंत्र्यचळवळ लक्षात घेऊन 'वंदे मातरम्' हे गीत शाळेने स्वीकारले.
सात विद्यार्थ्यांनी शाळा सुरु झाली... पहिल्या जनरल रजिस्टरचे पहिले पान...पहिले अध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे

पंढरीनाथ पांडुरंग म्हात्रे, बी. बी. तेंडूलकर, एन्. टी. दाबके, आर्. एम्. जयकर, एस्. जी. पाटकर, एस्. एच. जोशी आदी मान्यवर नागरिकांनी शाळा चालविण्यासाठी 'गोरेगाव शिक्षण मंडळ' नावाची संस्था स्थापन केली. पंढरीनाथ म्हात्रे पहिले अध्यक्ष झाले.
कार्यकारी मंडळाच्या पहिल्याच आणि त्यानंतरच्या काही सभांतील पुढील निर्णयांतून त्या काळातील आर्थिक बाबीं आणि प्राधान्यक्रमासंबंधी कल्पना येते.
> कार्यवाहांना 2 रुपये खर्च करण्याची परवानगी
> विविध कामांसाठी रकमांना मंजुरी - फळा 10 रुपये, कपाट 25 रु., 3 नकाशांसाठी 12 रु., मुले व शिक्षकांसाठी पुस्तके 15 रु., बॅट, बॉल व स्टंप्ससाठी 6 रु., शाळेच्या नामफलकासाठी 10 रु. . . .
> मासिक वेतन : मुख्याध्यापक - 15 रुपये, शिक्षक - 10 रुपये, विहिरीवरून पाणी भरुन आणणारा सेवक - 1 रुपया


1941

नैसर्गिक वाढीनुसार इयत्ता 6वी चा वर्ग सुरू झाला.


1942


सर बैरामजी जीजीभॉय


अनंता भिकोबा गोरेगावकर

गोरेगावचे खोत सर बैरामजी जीजीभॉय यांनी नऊ गुंठे (910 चौ. मी.) जमीन शाळेसाठी देणगी म्हणून दिली. चंदुलाल व दिवाकर अनंता गोरेगावकर यांनी आपले वडील, अनंता भिकोबा गोरेगावकर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या 5,601 रुपयांच्या देणगीतून शाळेची पहिली इमारत उभी राहिली. शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी श्रमदान करून इमारतीच्या बांधकामाला हातभार लावला. गोरेगाव एक खेडे असल्यामुळे शाळेला वीजपुरवठा नव्हता आणि पाणीसुद्धा शेजारच्या विहिरीतून मिळत असे. 'गोरेगाव शिक्षण मंडळ' हे संस्थेचे नाव बदलून 'दि शिक्षण मंडळ, गोरेगाव' असे करण्यात आले आणि संस्थेची रीतसर नोंदणी करण्यात आली..
1942 साली लावलेल्या मूळ पाट्या

आता शाळेचे नामकरण 'अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल' असे करण्यात आले. 18 ऑक्टोबर 1942 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर न्यायमूर्ती सर सिताराम पाटकर यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. इयत्ता 7वी चा वर्ग सुरू झाला आणि नवीन इमारतीत 5वी, 6वी व 7वीचे वर्ग भरू लागले. पुढे 1947-48 पर्यंत शाळेच्या 5वी, 6वी आणि 7वी अशा तीन इयत्ता होत्या.


शाळेची इमारत - 1942


उद्घाटन समारंभाची निमंत्रण पत्रिका- 18 ऑक्टोबर 1942

1943

संस्थेच्या सुरुवातीच्या हिशोबपत्रकांवरून त्या वेळच्या आर्थिक उलाढालींचा अंदाज करता येतो

1945

शासनाकडून अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलला मान्यता मिळाली आणि अनुदानही मिळू लागले.


1947

एल्. एम्. चव्हाण अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक झाले.


1948

चंदुलाल गोरेगावकर यांनी संस्थेला दिलेल्या दहा हजार रुपयांच्या देणगीतून चार नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या.

आतापर्यंत शाळेचे 5वी, 6वी आणि 7वी असे तीनच वर्ग होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्लिश भाषा शिक्षणाची सुरुवात 5वी ऐवजी 8वी पासून करण्याचा आदेश सरकारने काढला. त्याला अनुसरून संस्थेने क्रमाक्रमाने 5वी, 6वी व 7वीचे वर्ग बंद करून 8वी पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जून 1948 मधे इयत्ता 8 वीचा वर्ग सुरू झाला. तो पर्यंत 7 वी नंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गोरेगावबाहेरील शाळेत जावे लागत होते. 8वी चा वर्ग सुरू झाल्यामुळे गावातील मुलांच्या पुढच्या शिक्षणाची सोय गावातच होऊ लागली.


1949


चंदुलाल गोरेगावकर

चंदुलाल गोरेगावकर हे संस्थेचे अध्यक्ष झाले.
इयत्ता 9वी चा वर्ग सुरू झाला.
सगूण नाईक आणि आशा गवाणकर यांना मॉंटेसरीचे वर्ग शाळेच्या इमारतीत भरविण्याची परवानगी देण्यात आली.


1950

5वी चा वर्ग बंद करण्यात आला आणि 10वी चा वर्ग सुरू झाला.
गोरेगाव ग्रामपंचायतीकडून 1,000 रुपयांचे अनुदान मिळाले.
जून 1950 ते डिसेंबर 1952 या काळात अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेचे वर्ग अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या इमारतीमधे भरविण्यात आले.


1951

6वी चा वर्ग बंद करण्यात आला आणि इयत्ता 11वी चा वर्ग सुरू झाला.


1952

7वी चा वर्ग बंद करण्यात आला आणि मार्च 1952 मधे शाळेची पहिली तुकडी बोर्डाच्या शालांत परिक्षेला बसली.
बी. के. नेने शाळेचे मुख्याध्यापक झाले.
'विद्यामंदिर' या संस्थेची रात्रशाळा अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या इमारतीत भरू लागली.
पितळे यांच्या देणगीतून ‘अलका पितळे हॉल’चे बांधकाम पूर्ण करण्यात आले.


1953

बी. के. नेने अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक झाले.


1954

यावर्षी शाळेला वीज पुरवठा सुरू झाला.


द. गो. प्रभू 

द. गो. प्रभू अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक झाले. शिस्त, वक्तशीरपणा, नेटकेपणा, सामाजिक न्याय, अशांसारखी मूल्ये त्यांनी रुजवली. शिक्षणातील नवीन विचारांचे स्वागत करावे, उत्साहाने नवे प्रयोग हाती घ्यावे आणि ते सफल करण्यासाठी धडपडावे हे त्यांचे वैशिष्ट्य. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कार्यक्रमाची आखणी, तसेच जीवघेण्या स्पर्धेऐवजी सहकार्य आणि सांघिक प्रयत्न यावर त्यांचा भर होता. त्यांच्या कुशल नेत्रुत्वामुळे पुढील तीन दशकांत अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलची मुंबईच्या पश्चिम उपनगरातली एक उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख निर्माण झाली.


1956

जून पासून विद्यार्थ्यांसाठी गणवेश सक्तीचा झाला. मुलांसाठी अर्ध्या बाह्या, डाव्या बाजूला एक खिसा व ओपन कॉलर असलेला सफेद शर्ट आणि बाजुला दोन व मागे एक खिसा असलेली खाकी अर्धी विजार तसेच मुलींसाठी सफेद ब्लाऊज आणि आकाशी साडी किंवा खाकी स्कर्ट असा गणवेश ठरला.
मोतीराम नारायण देसाई टोपीवाले यांनी अंबाबाई देवस्थानची 3260 चौ. मी. जमीन खेळाच्या मैदानासाठी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने दिली.


1957

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचे सहा वर्ग शाळेच्या इमारतीत भरविण्यासाठी तात्पुर्ती परवानगी देण्यात आली.
आता पर्यंत संस्थेचा कारभार इंग्लिशमधून चालत असे. तो सर्व मराठीतून करण्याचा निर्णय झाला.


1958

पहिल्या मजल्यावरील चार वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले.


1960

शासनाने 5वी, 6वी व 7वी मधे एकाच वेळी 'इंग्रजी' हा भाषा विषय म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जून 1960 पासून 5वी, 6वी व 7वीचे वर्ग एकाच वेळी नव्याने सुरू करण्यात आले. 1959-60 पर्यंत शाळा एका सत्रात भरत असे. आता 5वी ते 11वी अशी परिपूर्ण असणारी माध्यमिक शाळा दोन सत्रांत भरू लागली.


1961

शाळेला महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा सुरू झाला. तोपर्यंत शाळेशेजारील विहिरीतून पाणी घेतले जाई.


1966

शाळेलगतची 4492 चौ. मी. जमीन जयकर कुटुंबियांकडून संपादित करण्यात आली.


भूमी संपादन - १९६६

सर्वश्री पोतदार, पोंक्षे, सामंत (शिक्षण मंडळ), 
पवार (भूमी संपादन अधिकारी)  - १९६६


1967-68 (रौप्यमहोत्सवी वर्ष)

26 व 27 नोव्हेंबर 1967 ला रौप्यमहोत्सव साजरा झाला. रौप्यमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम चंदुलाल गोरेगावकर यांच्या अध्यतेखाली आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला.


स्मरणिकेचे प्रकाशन करताना जे. पी. नाईक  - 1967


रौप्यमहोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम - 'शेपटीचा शाप' नाटकातील प्रसंग

1975

1974-75 पासून शालांत परीक्षा 11वी ऐवजी 10वी नंतर होऊ लागल्या.


1976

ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात आले.
जयकर कुटुंबियांकडून संपादित केलेल्या जमीनीवर शाळेची नवीन इमारत (तळ मजला आणि पहिला मजला) बांधण्यात आली. नवीन इमारतीचे उद्घाटन दिनांक 10-1-1976 रोजी डॉ. पी. व्ही. रेगे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मभूषण ए. व्ही. मोदी यांच्या हस्ते झाले. जून 1976 पासून नवीन इमारतीत शाळेचे वर्ग भरू लागले.


1977


दिवाकर गोरेगावकर

दिवाकर गोरेगावकर संस्थेचे अध्यक्ष झाले.
महाविद्यालयांना 10वी व 11वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाल्यामुळे जून 1977 पासून उच्च माध्यमिकचे वर्ग बंद करण्यात आले.


1984

विद्या प्रभुकेळूसकर अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झाल्या.


1989

मंगला बर्वे अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झाल्या.


1990

ज्योत्स्ना म्हस्कर अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झाल्या.


1992-93 (सुवर्णमहोत्सवी वर्ष)

9 व 10 जानेवारी 1993 ला सुवर्णमहोत्सव साजरा झाला. या निमित्ताने संस्थेने वर्षभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. यात परिसरातील शाळांच्या शिक्षकांसाठी व्याख्यानमाला आयोजित केली होती . त्यात प्रा. राम जोशी, प्रा. नलिनी पंडीत, डॉ. आनंद नाडकर्णी, रेणू गावस्कर, प्रा. भा. मा. उद्गावकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली.


सुवर्णमहोत्सव  मे. पु. रेगे प्रमुख पाहुणे


सुवर्णमहोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम


1994

अनंत देसाई अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक झाले.


1995

अनुपमा पातकर अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झाल्या.


1998

संगणक केंद्राच्या कामाला सुरुवात झाली. अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ कडून तेरा संगणक भेट म्हणून मिळाले.
बैरामजी जीजीभॉय यांच्याकडून मिळालेल्या भूखंडावरील मूळ इमारतीचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले.


1999

जून 1999 पासून बालवाडी सुरू झाली. दिनांक 17-एप्रिल-1999 रोजी बालवाडीचा उद्घाटन समारंभ माजी मुख्याध्यापक द. गो. प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली रुस्तम नानाभॉय जीजीभॉय यांच्या हस्ते झाला. उत्तरा अभ्यंकर बालवाडीच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. त्यानंतर मयुरा देशपांडे बालवाडीच्या दुसऱ्या मुख्याध्यापिका झाल्या.

बैरामजी जीजीभॉय कुटुंबियांनी बालवाडी व प्राथमिक शाळा स्थापन करण्यासाठी दहा लाख रुपयांची देणगी दिली आणि शाळेसाठी दिलेल्या भूखंडाचा वापर कायम स्वरुपाचे उत्पन्न मिळविण्यासाठी करण्यास परवानगी दिली.
नव्याने सुरू होत असलेल्या बालवाडीचे आणि प्राथमिक शाळेचे नामकरण ‘डोसीबाई जीजीभॉय बालविहार’ आणि ‘डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा’ असे करण्यात आले


2000

जून 2000 मधे इयत्ता 1ली पासून डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा सुरू झाली. पल्लवी शिरोडकर यांची पहिल्या शिक्षिका म्हणून नेमणूक झाली.
शासनाने इंग्लिश भाषेचे शिक्षण 1ली पासून सुरू केले.


मफतलाल मेहता यांच्या दिवालीबेन मोहनलाल मेहता चॅरिटेबल ट्रस्टकडून 31 लाख रुपयांची देणगी मिळाली आणि फैबा विमलाबेन कोठारी शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली. संकुलाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अरूण गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14-नोव्हेंबर-2000 रोजी झाले.

अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या इमारतीवर पाच वर्गखोल्या आणि प्रशस्त प्रयोगशाळा सामावणारा दुसरा मजला बांधण्यात आला.


2001

नैसर्गिक वाढीनुसार प्राथमिक शाळेत 2री चा वर्ग सुरू झाला.
दिवालीबेन मोहनलाल मेहता चॅरिटेबल ट्रस्टकडून साडेपाच लाख रुपयांची देणगी मिळाली. कमला मफतलाल मेहता संगणक केंद्राची स्थापना झाली.


2002

प्राथमिक शाळेत 3री चा वर्ग सुरू झाला.


दिगंबर पोंक्षे 

दिगंबर पोंक्षे संस्थेचे अध्यक्ष झाले.
20, 21 व 22 डिसेंबर 2002 ला हीरक महोत्सव साजरा झाला.


2003

रेखा देवल अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झाल्या.
प्राथमिक शाळेत 4थीचा वर्ग सुरू झाला. प्राथमिक शाळेच्या 1 ली, 2 री व 3 रीच्या वर्गांना महानगरपालिकेकडून मान्यता मिळाली. पल्लवी शिरोडकर डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या.


2004


गोविंद दळवी 


सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उमेश दळवी 

शाळेच्या मूळ इमारतीलगत नवीन इमारत बांधण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर दोन लहान सभागृहे तयार झाली. शाळेचे माजी विद्यार्थी उमेश दळवी यांनी 21.69 लाख रुपयांची देणगी दिली. पहिल्या मजल्यावरील सभागृहाचे 'गोविंद दळवी सभागृह' असे नामकरण करण्यात आले.
1940 साली तयार करण्यात आलेली संस्थेची घटना बदलत्या काळाला अनुसरून दुरूस्त करण्यात आली.


2005

अंबाबाई देवस्थान ट्रस्टने मैदानासाठी दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याची मुदत 999 वर्षे करून दिली.


विजय नाईक

शाळेचे माजी विद्यार्थी विजय नाईक संस्थेचे अध्यक्ष झाले.


2007

आसावरी पवार बालवाडीच्या मुख्याध्यापिका झाल्या


2009

इयत्ता 8 वी पासून विज्ञान व गणिताचे शिक्षण इंग्रजीतून मिळण्याचा विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पुढे 2010 व 2011 पासून नैसर्गिक वाढीनुसार 9 वी व 10 वी मधेही तो पर्याय उपलब्ध झाला.
आमदार सुभाष देसाई(शाळेचे माजी विद्यार्थी) यांच्या फंडातून शाळेच्या मैदानाचा विकास करण्यात आला.


2010

'बृहन्मुंबई निवारा अभियान' या संस्थेकडून 60 लाख रुपये, कुसूम सामंत व कुटुंबियांकडून 10 लाख रुपये आणि शाळेचे माजी विद्यार्थी अरविंद आचार्य यांच्याकडून 1 लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या. 'प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास' ची स्थापना झाली.

या केंद्राच्या कामाची औपचारिक सुरुवात 2-ऑक्टोबर-2010 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी झाली. त्या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह गिरीश सामंत यांनी लिहिलेले ‘वेध शिक्षणहक्काचा’ हे पुस्तक ‘दि शिक्षण मंडळ, गोरेगाव’ने प्रकाशित केले. पुस्तकाचे प्रकाशन ‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन’चे संचालक हेमचंद्र प्रधान व ‘जनार्थ, औरंगाबाद’ या संस्थेचे संचालक प्रवीण महाजन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नाईक होते
सुप्रिया राणे बालवाडीच्या मुख्याध्यापिका झाल्या.

अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या इमारतीचा विस्तार करण्यात आला. तळ मजल्यावर खुले सभागृह आणि पहिल्या मजल्यावर ग्रंथालयासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध झाले. दिवंगत कमलाकर गोविंद ठाकूर यांनी भूसंपादनाच्या कामात संस्थेला अमूल्य अशी मदत आणि मार्गदर्शन केले होते. कृतज्ञता म्हणून ग्रंथालयाचे ‘कमलाकर ठाकूर ग्रंथालय’ असे नामकरण करण्यात आले आहे.
समुपदेशन केंद्राच्या कामाला सुरुवात झाली.


2011

गौरी पणशीकर अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झाल्या.


2013

दिनांक 26-1-2013 ला माजी क्रीडा शिक्षिका वनमाला असनिकर यांच्या हस्ते अ. भि. गोरेगावकर क्रीडा अकादमीचे उद्घाटन करण्यात आले.


2014

पुष्पा सुतार अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झाल्या.


2015

बालवाडीचा अभ्यासक्रम दोन ऐवजी तीन वर्षांचा करण्यात आला.

शिक्षकदिन 2015


child porno child porno astropay astropay